पुणे प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे राष्ट्रवादीतील काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीत देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अशातच आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे…
मुनगंटीवार म्हणाले की, “आमच्या संपर्कात तिन्ही पक्षाचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये यायला तयार आहेत. पण आता त्यांना पक्षात आणून फायदा नाही, कारण त्यांचे सदस्यत्व रद्द होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मी कुणाचे नाव घेऊन संशय निर्माण करणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज काँग्रेस सरकार स्थापन करणार असून सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. त्यावर देखील मुनगंटीवार यांनी भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की, राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील. आमचे सरकार होते, तेव्हा तिथे भाजपचे सरकार असल्याची ओरड ते करत होते’, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
- श्री.गणेश जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )