पुणे प्रतिनिधी – जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी कोणाकोणाची नेमणूक होणार ही उत्सुकता आता संपली असून, शुक्रवारी धर्मादाय कार्यालयाकडून सात विश्वस्तपदांचे नावे जाहीर करण्यात आली आहे.त्यामध्ये जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी अभिजित अरविंद देवकाते (रा. बारामती), डॉ. राजेंद्र बबन खेडेकर (रा. कोथरूड), मंगेश अशोक घोणे (रा. जेजुरी), विश्वास गोविंद पानसे (रा. बारामती), अनिल रावसाहेब सौंदाडे, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे (रा. बालेवाडी) आणि पोपट सदाशिव खोमणे (रा. जेजुरी) अशी नवनियुक्त विश्वस्तांची नावे आहेत.
ही नेमणूक पाच वर्षांसाठी असणार आहे. याआधी जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका 2017 ला झाल्या होत्या. त्यांची मुदत डिसेंबर-2022 मध्ये संपली होती. यानंतर नवीन विश्वस्तांच्या पदासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.त्यापैकी या सात जणांची नेमणूक पुणे सहधर्मादाय कार्यालयाचे सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केल्या आहेत. या विश्वस्तांमधून प्रमुख विश्वस्तांची निवड बैठक घेऊन विश्वस्तच करणार आहेत. एका प्रमुख विश्वस्तांचा कालावधी हा नऊ महिन्यांचा असून प्रत्येक विश्वस्तांना पाच वर्षांत नऊ- नऊ महिन्यांच्या अंतराने प्रमुख विश्वस्तपद मिळणार आहे.
महाराष्ट्र जोशी समाज संस्था ( राष्ट्रीय मान्यता प्राप्त ) यांच्या वतीने नवचर्तीत विश्वस्त झाल्याबद्दल डॉ.राजेंद्र खेडेकर यांचा श्री.निलेश प्रकाश निकम ( राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.संजय गुलाब जोशी यांनी दिली.
- श्री.विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )