पुणे प्रतिनिधी – गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून वाद होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने महिना झाला तरी शिवाजी पार्क परिसर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी मिळालेली नाही.परवानगी न मिळाल्याने तयारीसाठी अडचणी येत असल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. सत्ताधारी शिवसेना पक्ष सत्तेचा गैरफायदा घेत परवानगी लटकवून ठेवत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.मागच्या वर्षीही दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद झाले होते, त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. पण मुंबई महापालिकेने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट दोघांच्या बाजून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच मुंबई महापालिका देखील कोर्टात गेली होती.
कोर्टाने तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेत मुख्य शिवसेनेला दसरा मेळावासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेतला, तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानात झाला होता. मागच्या वर्षी शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे असे दोन गट होते, पण यंदा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. निवडणूक आयोगाचा हा निर्णय दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देताना महत्त्वाचा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
— श्री.गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )