हिंदजागर न्युज प्रतिनिधी – महापालिकेतर्फे इयत्ता दहावी आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल जाते.यासाठी नऊ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील. दरम्यान, यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असली तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असेल.
समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षी जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद उपलब्ध आहे.
यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे महापालिकेनेही शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरा सुरु केली आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू झाल्यास विद्यार्थ्यांना पैसे जमा होण्यासाठी जून महिन्यापर्यंत वाट बघावी लागू शकते..
=== श्री.प्रदिप कांबळे ( वार्ताहार )