हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ‘पुणेकरांना एकाच तिकिटामध्ये पीएमपी आणि मेट्रोमध्ये प्रवास करता येणाऱ्या सुविधेवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.’पीएमपी’च्या सर्व बसमध्ये प्रवाशांना ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून तिकिटाची सोय असलेल्या यंत्रणेचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘पीएमपी’चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी स्वतः ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून तिकीट काढले.
‘ देशात डिजिटल व्यवहार वाढत आहेत. जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार देशात होतात. त्यामुळे पीएमपीमध्ये ही सेवा का सुरू केली जात नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. आता पीएमपीच्या प्रवाशांना ही सेवा सुरू करण्यात आली आहे,’ असे सांगून पाटील म्हणाले, की ‘पीएमपीने त्यांची सेवा एवढी सक्षम करावी, की नागरिकांना आपली वाहने घेऊन फिरावे लागणार नाही. गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रोमध्ये सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला;त्याच वेळी पीएमपी प्रवासीसंख्याही वाढली. मेट्रो आणि पीएमपी यांची एक साखळी निर्माण व्हावी. घरातून निघताना प्रवाशांना पीएमपी बस आणि नंतर मेट्रो असा प्रवास करता येईल. त्यासाठी पीएमपी आणि मेट्रोचे तिकीट एकच असावे. एकाच कार्डवरून तिकीट काढता यावे, यासाठी काम सुरू आहे.’
डॉ. सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले,’पीएमपीकडून चांगली सेवा देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. सध्या दिवसाला पीएमपीतून १३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. नागरिकांना मोबाईलवर तिकीट काढता आले पाहिजे, यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात येत आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आणखी बसची आवश्यकता आहे. पुढील तीन ते चार महिन्यात काही बस येतील. प्रवाशांना चांगली सेवा देण्यावर आमचा भर राहील.नागरिकांना घरातून बाहेर पडताना बस किती वेळेत थांब्यावर येणार आहे, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मोबाइल अँप विकसित करण्यात येणार आहे. कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तोट्यातच चालते. त्यासाठी सरकार तुटीचे पैसे देते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नफ्यात चालत असेल, तर तुम्ही सुविधा देत नाही असे होते.
क्यूआर सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद
‘क्यूआर कोड’वरून तिकीट सेवेचे उदघाटन झाल्यानंतर रविवारी दुपारी साडेतीन पर्यंत ९३१ प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास केला. यातून २६ हजार ७४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. सायंकाळपर्यंत सुमारे ५०० तिकिटे ‘क्यूआर कोड’द्वारे काढण्यात आली. यातून सुमारे १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.
मी नेहमी पीएमपीने प्रवास करतो. सुट्ट्या पैशांमुळे नेहमी अडचण येत होती. सुट्ट्या पैशांवरून नेहमी वाद होताना दिसत होते. सध्या कुठेही यूपीआयद्वारे पैसे देण्याची सुविधा आहे. पण, ती पीएमपीत का नाही असा प्रश्न पडत होता. आता पीएमपीने सुविधा सुरू केल्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे. श्री.रवींद्र शिवाजी जोशी ( मुख्याध्यापक, रा – धनकवडी )