हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सोलर सिस्टीम बसवून देणाऱ्या ठेकेदाराला एन.ओ.सी देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या चिंचवड गावातील महावितरण कंपनीच्या गणेश खिंड अर्बन, चाचणी विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंत्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्रकुमार साळुंखे असे गुन्हा दाखल केलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. साळुंके यांच्यावर बुधवारी (दि.4) चिंचवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.याबाबत 38 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे सोलर सिस्टिमचे ठेकेदार आहेत. सोलर सिस्टिम बसवून देण्याकरीता ग्राहक व एम.एस.ई.डी.एल. (महावितरण) यांचेमध्ये लायझनिंगचे काम करतात. तक्रारदार यांनी ग्राहकाचे घरी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनच्या कामाची एन.ओ.सी. / तपासणी अहवाल मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. त्याचा पाठपुरावा तक्रारदार स्वत: करीत होते. कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे एन.ओ.सी. व मीटर टेस्टींगसाठी 10 हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. पुणे एसीबीच्या पथकाने 23 ऑगस्ट रोजी प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, राजेंद्रकुमार साळुंखे यांनी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनची एन.ओ.सी. व मीटर टेस्टींगसाठी म्हणुन स्वत:साठी तसेच कार्यालयातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे साळुंखे यांच्यावर बुधवारी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर ,सहायक पोलीस फौजदार मुकुंद आयाचित, पोलीस अंमलदार वेताळ, प्रवीण तावरे, चालक दिपक दिवेकर,चंद्रकांत कदम, चालक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या पथकाने केली.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )