हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –सन 1999 मध्ये राज्याचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जेमतेम 8 हजारांनी पराभूत झालेले आंबेगावचे (उबाठा) जिल्हा संघटक नेते अॅड. अविनाश रहाणे.2004 पासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामागे भक्कमपणे उभे राहून खासदारकीची हॅट् ट्रिक करून आता 2024 मध्ये शिरूर-लोकसभेसाठी आढळरावांनाच शड्डू ठोकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहणारे अॅड. अविनाश रहाणे यांचे आज सकाळी 7 च्या सुमारास एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते. मात्र, या जिगरबाजाची मृत्य़ूशी झुंज अपयशी ठरली.
सन 1999 मध्ये महायुतीतील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उभे राहून जेमतेम आठ हजारांच्या फरकाने पराभूत झालेले तत्कालीन जिल्हा प्रमुख अॅड. अविनाश रहाणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच पक्षबांधणी सुरू केली आहे.2004 मध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेत घेण्यापासून तर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघातील सभांचे नियोजनही अॅड. रहाणे यांचेच असे. 2004, 2009, 2014 या तीनही लोकसभा निवडणुकीत अॅड. रहाणे हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे प्रचारप्रमुख म्हणून राहिले व निवडणुका जिंकूनही दिल्या.
जन्मत: शिवसैनिक म्हणून स्वत:ला मिरवणारे अॅड. रहाणे यांनी सव्वा वर्षापूर्वी शिवसेनेत मोठे बंड होऊनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केले. पर्यायाने ते सध्या ठाकरे गटाचे जिल्हा संघटक म्हणून चांगली कामगिरी करीत होते.याच पार्श्वभूमीवर अॅड. रहाणे यांचेशी दीड महिन्यापूर्वी ‘सरकारनामा’शी सांगितले होते की, माझा आक्रमक व प्रामाणिक शिवसैनिक म्हणूनचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे. मी फक्त शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याभोवतीच माझी निष्ठा आणि माझा श्वास बहाल करून आजपर्यंत जगलेलो आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ज्यांनी शिवसेनेत राहून लोकसभेत जाण्याची तीन वेळा संधी मिळविली, त्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात मी उभा राहणार आहे आणि जिंकणारही आहे. ‘मला फक्त आता उद्धव साहेबांनी फक्त लढ म्हणावं एवढंच….’या त्यांच्या जिगरबाज वृत्तीची शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चाही होती. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांना जडलेल्या हेवी शुगर व उच्च रक्तदाबामुळे त्यांना भोसरीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची काल रात्री उशिरा आढळराव यांचे सह आंबेगाव मधील अनेक सर्वपक्षीय पदाधिका-यांनी भेटही घेतली होती. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघात कळाले आणि सर्वत्र शोककळा पसरली.
==== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )