हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – मुंढवा परिसरात नदीपात्रात राजरोसपणे सुरू असलेल्या पबवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र, या पबवर ‘पावरफूल’ राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने, ही कारवाई सुरू होताच तत्काळ थांबविण्यात आली.दरम्यान, या पबच्या शेजारीच असलेल्या एका पबवर कारवाई झाली; अन् दुसऱ्या पबला कारवाईतून मुक्ती देण्यात आल्यामुळे पालिकेच्या पक्षपातीपणाची जोरदार चर्चा या परिसरात रंगली आहे.
बेकायदा बांधकामांना आळा कसा बसणार? नागरिकांत चर्चा
मुंढवा परिसरातील एका पबवर कारवाईसाठी महापालिकेची यंत्रणा जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्रीसह पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचली. मात्र, राजकीय वरदहस्त असलेल्या पबमालकाने काही वेळातच कारवाई रोखली. दरम्यान, महापालिकेने शेजारीच एका पबचे बांधकाम सुरू असतानाच तेथे कारवाईही केली होती. पबचालकाला यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र, शेजारील पबवर कारवाई झाली नाही. यामुळे स्थानिकांकडून महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर टीका करण्यात येत आहे.दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी नुकतीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाढत्या अनधिकृत बांधकामांविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर बेकायदा ‘रुफ टॉप हॉटेल’वर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, काही दिवसांतच पुन्हा ही हॉटेल सुरू होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने यापूर्वी ९७ हॉटेलवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या बेकायदा हॉटेलविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.
”रुफ टॉप हॉटेल’सह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि १५ दिवसांत अहवाल सादर करा,’ असे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.मात्र, कारवाईमध्ये अशा प्रकारे पक्षपातीपणा केल्यास बेकायदा बांधकामांना आळा कसा बसणार, अशी चर्चा आहे.