हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले, अशी राजकीय परिस्थिती असली तरीदेखील इंदापूर तालुक्यात मात्र बारामतीच्या पवार घराण्याला, तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आज तरी शरद पवार गट, अजित पवार गट असे राजकीय अंतर स्पष्टपणे देण्यास तयार नाहीत; मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर शहरावर आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असावे यासाठी विशेष लक्ष दिले असून, इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या इंदापूर शहरातील निवासस्थानी जाऊन, संपूर्ण शहा परिवाराची अचानक सदिच्छा भेट भेटली.त्यामुळे इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस मय करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याची चर्चा इंदापुरात रंगलेली आहे. काही महिन्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार गट राज्यातील सत्तेच्या बाजूने झाला. त्यामुळे एकसंध असणारी राष्ट्रवादी विभागली गेली. इंदापूर तालुक्याचे राजकीय वातावरण मात्र या राजकीय खेळात सध्याच्या घडीला तापत चालले आहे. आमदार दत्तात्रय भरणे आजपर्यंत खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या हद्दीत येताच, आपल्या हाताची कामे सोडून इंदापूर तालुक्यात आमदार भरणे तळ ठोकायचे; मात्र आताचे राजकीय चित्र वेगळे दिसते आहे. तरीपण कोणत्याही विकास कामासाठी तालुक्याला निधी मिळाला की, खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख आमदार दत्तात्रय भरणे करतात.इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक प्रश्न संदर्भात माहिती घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी देशपातळीवर आदर्श ठरलेल्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांची घरी जाऊन भेट घेतली. खरे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात कोठेही शहा परिवाराच्या भेटीचा उल्लेख नव्हता. मात्र राजकारणाच्या कोंदणातील हिरा म्हणून काम करत असलेल्या, शहा परिवाराला आगामी काळात राजकीय पाठबळ देण्याची भूमिका खासदार सुळे यांनी घेतल्याचे खात्रीलायक कळते. त्यामुळे काही महिन्यातच इंदापूर नगर परिषदेची व इतर तालुक्यातील महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शहा परिवार पूर्ण ताकदीने उतरला तर मात्र वेगळे चित्र इंदापूर शहरवासी यांना पाहण्यास मिळणार आहे हे मात्र निश्चित.
दुरावलेली मंडळी पुन्हा संपर्कात
राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून दुरावलेली अनेक मंडळी व इंदापूर तालुक्यातील राजकीय मातब्बर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा देताच, आपल्याबरोबर घेण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी यश मिळवले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते अमोल भिसे, अरबाज शेख अशा अनेक नेत्यांची फळी खासदार सुळे उभी करीत आहेत.