हिंदजागर न्यूस प्रतिनिधी – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आज यांचा १० ऑक्टोंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात त्यांचे बॅनर्स लागले आहेत. त्या बॅनरवर भावी खासदार म्हणून वसंत मोरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.त्यांच्या त्या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरु असताना आता त्यांना लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. वसंत मोरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर गिफ्ट दिली आहे.
शहराध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली. मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं. मोरे यांची नाराजी अनेकदा चर्चेचा विषय ठरली, मात्र, त्यांची राज ठाकरेंवरील श्रद्धा कायम राहिली. आता, पुन्हा एकदा राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातील नेता-कार्यकर्ता प्रेमाचा फोटो वसंत मोरेंनी शेअर केला आहे. ”खूप दिवसांनी या मायेच्या हाताची ऊब आज पुन्हा खांद्यावर जाणवली. आज पुन्हा धन्य झालो”, अशी पोस्ट करत मोरेंनी राज ठाकरेंसमवेतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे, मोरे आगामी निवडणुकांत मनसेकडूनच मैदानात उतरतील हे दिसून येतंय.
वाढदिवसाचं गिफ्ट ॲम्बेसिडर कार मनसेचे वसंत मोरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मनसेतील अंतर्गत वादामुळे, कधी राज ठाकरेंच्या भेटीमुळे, कधी सभेला गैरहजरीमुळे तर आता पुन्हा एकदा वसंत मोरे वाढदिवसामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वाढदिनी मध्यरात्री कार्यकर्त्यांनी चक्क लाल दिव्याची ॲम्बेसिडर कार त्यांना भेट दिली आहे. अखिल मोरे बाग मित्र मंडळाकडून वसंत मोरे यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर भेट देण्यात आली आहे.
=== प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )