हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो-3 चे काम सुरू आहे. यात आचार्य आनंद ऋषिजी चौक (विद्यापीठ) चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.या कामासाठी गणेशखिंड रस्ता 45 मीटर रुंद केला जाणार आहे. यासाठी 21 कोटी 69 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यातील 50 टक्के हिस्सा द्यावा, अशी मागणी महापालिकेने “पीएमआरडीए’कडे केली आहे.
गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेने आठ निविदा काढल्या असून, पूर्ण खर्च करायचा असल्यास महापालिकेकडे आवश्यक तरतूद नाही. त्यामुळे हा निधी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी पथ विभागाकडून करण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल “आरबीआय’ कृषी महाविद्यालयापर्यंत आहे. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यानंतर मुख्य रस्त्यावर वाहनांसाठी जागाच राहत नाही. हा रस्ता विकास आराखड्यात 45 मीटर रुंद असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी तो केवळ 30 ते 35 मीटर रूंद आहे.
रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 21 पैकी 15 मिळकतींचा ताबा पालिकेस आला आहे; तर उर्वरित जागाही सहमतीने ताब्यात आहे. मात्र, या जागांवर सीमाभिंत, सेवा वाहिन्या-वीज वाहिन्यांचे स्थलांतर अशी कामे आहेत. त्यासाठी जवळपास 21 कोटी 69 लाख रुपयांच्या निविदा महापालिकेने काढल्या आहेत. त्या मान्यतांच्या प्रक्रियेत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने 15 नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्यानुसार या कामांचा खर्च महापालिका आणि पीएमआरडीए प्रत्येकी 50 टक्के करणार आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )