हिंदजागर न्यूज,प्रतिनिधी पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजित दौरे अचानकपणे रद्द केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आजही शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदारसंघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता होणार होते.नियोजित दौरा असल्यामुळे अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण त्यापूर्वीच माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची स्थती निर्माण झाली होती. अजित पवार कार्यक्रमाच्या ठिकाणी का पोहोचले नाही व पुढील नियोजित कार्यक्रम का रद्द केले याबाबत शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही !!
दरम्यान, या टाकीची जागा ताब्यात घेणे भूमिपूजन करणे यासाठी काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केलेले होते. माझ्या प्रयत्नातून या टाकीचे पाण्यासाठी मोफत जागा मिळाली, निधी उपलब्ध करून दिला पण आज याची कदर न करता भाजप या कार्यक्रमाचे श्रेय लाटत आहे, असा आरोप श्री.बहिरट यांनी केला होता. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने काँग्रेसला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवावे अन्यथा आम्हीच या ठिकाणी उद्घाटन करू असा इशारा श्री.बहिरट यांनी या आधीच दिलेला होता.
शुक्रवारी आशानगर येथे पाण्याच्या टाकीचा उद्घाटनाचा समारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी, आमदार धंगेकर, बहिरट रमेश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी आशा नगर येथे उपस्थित झाले. पोलिसांनी त्यांना रोखले पण धंगेकरांनी आतमध्ये जाऊन नारळ फोडून टाकीचे उद्घाटन केले. यावेळी काँग्रेस व पोलिसांमध्ये झटापट झाली.
दरम्यान, उद्घाटनाचा कार्यक्रम आधीच उरकल्यामुळे पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पोलिसांनी आत जाण्यापासून रोखले होते. त्यावरून पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला.या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार नसल्याचे कळविले. तर या कार्यक्रमासह पुणे शहर आणि ग्रामीण भागातील इतर पाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे रद्द केले. हे सर्व कार्यक्रम अजित पवार यांनी अचानकपणे का रद्द केले असावेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )