हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी 1 महिना बंद असणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या एक महिन्याच्या काळामध्ये मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.भाविकांनी त्यासाठी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनातकडून करण्यात आलं आहे.
सेनापती बापट रोडवरील चतु:श्रुंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. काही दिवसांवर आलेल्या नवरात्रीसाठी चतु:श्रुंगी मंदिराचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळेच चतु:श्रुंगी देवीमंदिराच्या जेर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शन बंद राहणार असल्याची सूचना मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री चतु:श्रुंगी देवीचे मंदिर हे जीर्णोद्धाराच्या कामासाठी 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत भाविकांचा दर्शनासाठी बंद राहणार आहे. देवीची मूर्ती या कालावधीत पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध असेल. भाविकांनी या जीर्णोद्धाराच्या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
पुणे शहरातील चतुश्रृंगी देवी तिला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि अंबरेश्वरी सहयोगी श्री देवी चतुश्रृंगी म्हणूनही ओळखले जाते. तिचे मंदिर पुण्याच्या वायव्येला डोंगराच्या कुशीत आहे. हे निसर्गाच्या नयनरम्य सौंदर्याच्या मध्यभागी आहे. या 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद मंदिराची देखभाल श्री देवी चतुश्रृंगी मंदिर ट्रस्ट करते.
जीर्णोद्धाराच्या कामाबाबत माहिती देताना ट्रस्टच्या वेबसाइटवर म्हटलं आहे, “श्री चतुश्रृंगी देवस्थान ट्रस्ट सध्याच्या मंदिराच्या वारसा आणि भावनेशी तडजोड न करता मंदिराच्या नूतनीकरणाचे काम करत आहे. नूतनीकरण (जिर्णोद्धार) अशा प्रकारे नियोजित आहे की दृष्टीकोनातील पायऱ्या अधिक सोयीस्कर होतील, सभामंडप मोठा होईल आणि सभामंडपाच्या चारही बाजूंनी टेरेस आणि बाकी भाग सुशोभित होईल.”
मुख्य सभामंडपाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे की भक्तांना मंडपात प्रवेश करताच देवीचे दर्शन घडेल आणि त्यांना दैवी स्वरूपाचे मंत्रमुग्ध दर्शन घेता येईल. ट्रस्ट डोंगराच्या पायथ्यापासून मुख्य मंदिरापर्यंत एस्केलेटर बसवण्याचा विचार करत आहे ज्यामुळे लोकांना मुख्य मंदिरात सहज आणि थेट प्रवेश मिळण्यास मदत होईल. यामुळे आमच्या दिव्यांग आणि वृद्ध भक्तांना कमी प्रयत्न करून मंदिरापर्यंत पोहोचता येईल अशी भावना मंदिराच्या ट्रस्टने व्यक्त केली आहे.
प्रस्तावित मंदिराची रचना तीन मजली असेल. गर्भगृह आणि शिखर ही वारसा स्थळे आहेत आणि ती जशीच्या तशी ठेवली जातील. सर्वात खालच्या मजल्यावर एक ध्यान मंदिर (ध्यान हॉल) प्रस्तावित आहे. मधल्या मजल्यावर मंदिराच्या पुजाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असेल आणि तिसऱ्या मजल्यावर मुख्य मंदिर सभामंडप असेल. तिसऱ्या मजल्यावरील टेरेस पुणे शहराचे विहंगम दृश्य भाविकांना पाहता येईल.
Repoter – प्रदीप कांबळे.