मान–रामनगरदरम्यानची १२ स्थानके तयार; शिवाजीनगर भागातील पाच स्थानकांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने..
हिंदजागर प्रतिनिधी | पुणे – पुणे शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडीला पर्याय देणाऱ्या हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाची शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी टाटा, सिमेन्स तसेच प्रकल्पाच्या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हिंजवडी आयटी हब आणि पुण्याच्या मध्यवर्ती शिवाजीनगर परिसराला जोडणारा हा प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे २३.३ किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गावर एकूण २३ स्थानके प्रस्तावित असून, मान ते सिव्हिल कोर्ट असा हा मार्ग हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि बाणेरमार्गे पुढे जाणार आहे.
पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या स्थानकांची उभारणी, अंतर्गत तांत्रिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि उर्वरित कामांचा आढावा घेण्यात आला. मान ते रामनगरदरम्यानची १२ स्थानके तयार झाली असून, शिवाजीनगर मतदारसंघातील सातपैकी पाच स्थानकांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, मान–बालेवाडीच्या सुमारे आठ किलोमीटरच्या प्रारंभिक विभागासाठी प्रवासी सेवा सुरू करण्यास मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. पुढील पाच स्थानकांच्या सुरक्षा तपासणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर प्रवासी सेवेचा टप्पा आणखी विस्तारित होऊ शकतो.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून उर्वरित कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. पुण्याच्या प्रवेशमार्गांवर अनेक वर्षांपासून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना या मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि बाणेर परिसरातील नागरिकांसह हजारो आयटी कर्मचाऱ्यांना शिवाजीनगरपर्यंत वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. सिव्हिल कोर्ट स्थानकावरील इंटरचेंजमुळे पुणे मेट्रोच्या इतर मार्गांशीही प्रवाशांना सहज जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी उर्वरित सुरक्षा तपासण्या आणि वैधानिक मंजुऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रवासी सेवा सुरू करण्याची अंतिम तारीख अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसल्याने पुणेकरांचे लक्ष आता उर्वरित मंजुऱ्या आणि उद्घाटनाच्या घोषणेकडे लागले आहे.
—–श्री.गणेश मारुती जोशी,हिंदजागर प्रतिनिधी..



