दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर जुनी सांगवीत दुर्दैवी दुर्घटना; लोखंडी कमान कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यूकार्यक्रमासाठी उभारलेले लोखंडी स्ट्रक्चर उतरवताना दुर्घटना; संभाव्य निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडून चौकशी
पिंपरी-चिंचवड | हिंदजागर ऑनलाइन न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्टेज आणि साऊंड स्ट्रक्चर उतरवताना त्याचा एक जड भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली.मृत महिलेचे नाव सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५, रा. जुनी सांगवी) असे आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर अचानक कोसळले स्ट्रक्चर
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जुनी सांगवी परिसरातील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाचा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेज, स्पीकर आणि त्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू होते.
त्याचवेळी सलमा पठाण आपल्या पतीसोबत कार्यक्रमस्थळाजवळून जात असताना लोखंडी स्ट्रक्चरचा एक जड भाग अचानक त्यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जुनी सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सांगवी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद – सांगवी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्ट्रक्चरला आवश्यक परवानगी होती का, ते उभारताना आणि उतरवताना सुरक्षिततेच्या अटींचे पालन करण्यात आले होते का, तसेच दुर्घटनेस कोणाची निष्काळजीपणा कारणीभूत ठरला का, या मुद्द्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाचा कार्यकर्ता असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार दिलेली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, कुटुंबीयांची तक्रार नसली तरी दुर्घटनेमागील संभाव्य निष्काळजीपणा आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
उत्सवांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सार्वजनिक उत्सवांमध्ये भव्य स्टेज, लोखंडी कमानी, मोठे स्पीकर आणि विद्युत रोषणाईची यंत्रणा उभारली जाते. अशा संरचना उभारताना तसेच कार्यक्रमानंतर त्या उतरवताना प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षित अंतर, बॅरिकेडिंग आणि तांत्रिक देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे.जुनी सांगवीतील या दुर्घटनेने उत्सवांच्या आयोजनात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. संबंधित यंत्रणांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर सुरक्षा नियम लागू करावेत, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
— हिंदजागर ऑनलाइन न्यूज, पुणे



