पिंपरी-चिंचवड | हिंद जागर ऑनलाइन न्यूज प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिला आणि तीन पुरुष अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
परिसरातील माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर तपास पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत सात संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चोरीच्या घटनांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. आरोपींकडून महागड्या वस्तू आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह एकूण ₹७,२९,९६० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांच्या या कारवाईमुळे दुकानांमधील महागड्या वस्तूंवर हात साफ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.



