ठेकेदारावरील कारवाईकडे कानाडोळा का? आणखी मोठा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?
हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल, पुणे | वाकडेवाडी – पदपथ खोदलेला, काढलेले पेव्हर ब्लॉक वाटेत, रात्री दिवे नाहीत आणि धोक्याचा इशारा देणारा फलकही नाही. प्रभाग क्रमांक ७ मधील वाकडेवाडी भुयारी मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीबाबत ही तक्रार आहे. याच भुयारी मार्गाच्या आत रात्री झालेल्या अपघातात जनवाडीतील १४ वर्षांचा मुलगा जखमी झाला. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती तक्रारदार श्री. निलेश प्रकाशशेठ निकम यांनी दिली.
‘ठेकेदाराला सांगू’ एवढंच उत्तर? कारवाई करणार कोण?
पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागातील अधिकारी सौ. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘सोमवारी बघू, ठेकेदाराला सांगू,’ असे उत्तर मिळाल्याचे निलेश प्रकाशशेठ निकम यांनी सांगितले. ठेकेदारावर काय कारवाई होणार आणि तोपर्यंत पादचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, या प्रश्नांना स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका मुलाचा हात मोडल्यानंतरही धोकादायक भाग बंद करण्यासाठी, दिवे लावण्यासाठी आणि वाटेतले ब्लॉक हटवण्यासाठी सोमवारची वाट कशाला? आणखी मोठा अपघात घडल्यावरच प्रकल्प विभाग हलणार का? असा सवाल निकम यांनी उपस्थित केला.
पदपथ खोदला तेव्हा पालिकेची देखरेख कुठे होती?
भुयारी मार्गाच्या प्रवेशाजवळ बसवलेल्या लोखंडी खांबांचे तळ काँक्रीटने पक्के केलेले नसल्याचा आणि दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप निकम यांनी केला. पदपथ खोदल्यानंतर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वाट ठेवण्याची अट ठेकेदाराला घातली होती का, तिचे पालन कोणत्या अधिकाऱ्याने तपासले आणि अपघाताची माहिती मिळाल्यावर काय केले, याचा लेखी खुलासा प्रकल्प विभागाने करावा , अशी त्यांची मागणी आहे.
ठेकेदारावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा’ — निलेश प्रकाशशेठ निकम
चौकशीच्या नावाखाली कारवाई लांबवू नये आणि या अपघातप्रकरणी ‘ठेकेदारावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा’, अशी थेट मागणी निलेश प्रकाशशेठ निकम यांनी केली. रस्त्यावरचे ब्लॉक तातडीने हटवावेत, खोदलेल्या भागाभोवती मजबूत अडथळे उभारावेत आणि दिवे व सूचना फलक लावावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
बातमीदार – श्री. गणेश मारुती जोशी



