बालेवाडी मध्ये तोतया आयएएस बनला सोसायटीचा अध्यक्ष; ३५ लाखांचा गैरव्यवहार, नातेवाईकांनाही १९ लाखांचा गंडा!

1 Min Read

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे – पुण्यातील बालेवाडी परिसरात आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून एका २२ वर्षीय तरुणाने गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्षपद मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यक्षपदाचा गैरफायदा घेत सोसायटीच्या सुमारे ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

हितेश कुलकर्णी असे या तरुणाचे नाव असल्याचे वृत्त आहे. त्याने २०२५ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्याचे सोसायटीतील रहिवाशांना सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रहिवाशांनी त्याची सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याचे सांगण्यात येते.

अध्यक्षपदाची सूत्रे हाती आल्यानंतर त्याने सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवले. सोसायटीच्या नावावर कर्ज घेणे, मुदत ठेवी मोडणे आणि विविध खात्यांमधील रक्कम परस्पर वळवणे अशा प्रकारातून सुमारे ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे, तर सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या नातेवाईकांकडूनही सुमारे १९ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का तसेच गैरव्यवहाराची नेमकी व्याप्ती किती आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बातमीदार – श्री. गणेश मारुती जोशी,हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल, पुणे

Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment