LPG ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल; आधार बायोमेट्रिक पडताळणीबाबत नवा नियम
नवी दिल्ली | हिंदजागर ऑनलाईन न्यूज – देशभरातील घरगुती LPG गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून सबसिडीच्या लाभाशी संबंधित नियमात महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. सबसिडीच्या दरात LPG रिफिलचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे आधार-आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण (Biometric Aadhaar Authentication) पूर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे.
पडताळणी नाही केली तर सिलिंडर मिळणार नाही का?याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण नसल्यामुळे तुमचे गॅस कनेक्शन तात्काळ बंद होणार नाही किंवा सिलिंडर मिळणे पूर्णपणे थांबणार नाही. मात्र, ज्या ग्राहकांना लागू असलेली LPG सबसिडी मिळते, त्यांच्या सबसिडीच्या लाभावर परिणाम होऊ शकतो. आवश्यक प्रमाणीकरण पूर्ण नसेल तर सिलिंडर बाजारभावानुसार घ्यावा लागू शकतो.
आधीच बायोमेट्रिक केले आहे? मग काळजी नको! – ज्या ग्राहकांनी यापूर्वीच आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या LPG कनेक्शनची बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण आहे की प्रलंबित, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
बायोमेट्रिक पडताळणी कुठे करता येणार?
ज्या ग्राहकांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांना संबंधित LPG गॅस वितरकाच्या कार्यालयात, सिलिंडरच्या होम डिलिव्हरीच्या वेळी उपलब्ध सुविधेद्वारे किंवा संबंधित तेल कंपनीच्या अधिकृत डिजिटल माध्यमातून प्रमाणीकरण पूर्ण करता येऊ शकते. प्रक्रिया करताना केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करावा.
सरकारने हा बदल का केला? – LPG सबसिडीचा लाभ योग्य आणि पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचावा, बनावट किंवा अपात्र कनेक्शनवर नियंत्रण आणता यावे तसेच घरगुती LPG सिलिंडरच्या गैरवापराला आळा बसावा, या उद्देशाने आधार-आधारित पडताळणीवर भर देण्यात येत आहे.
ग्राहकांनो, एवढं लक्षात ठेवा…
1 ऑक्टोबरची वाट पाहू नका. तुमच्या LPG कनेक्शनचे आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण झाले आहे की नाही, याची खात्री करून घ्या. प्रक्रिया बाकी असल्यास आपल्या अधिकृत गॅस वितरकाशी संपर्क साधून ती पूर्ण करा. तसेच LPG संदर्भातील कोणत्याही अनोळखी फोन, मेसेज किंवा लिंकवर आधार क्रमांक, OTP अथवा बँक खात्याची माहिती देऊ नका. एका छोट्याशा पडताळणीमुळे पुढे होणारी गैरसोय टाळता येऊ शकते. त्यामुळे ही माहिती आपल्या कुटुंबातील तसेच परिचित LPG ग्राहकांपर्यंत नक्की पोहोचवा.



