ड्रेनेजमधील पिण्याच्या पाण्याच्या लाईन्सचा प्रश्न ऐरणीवर; स्वतंत्र HDPE लाईनसाठी नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आयुक्तांकडे ठोस पाठपुरावा

2 Min Read

पुणे | हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल – पुणे शहरातील वाडेवस्ती, झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये ड्रेनेज लाईनमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक रवींद्र मारुती साळेगावकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.ड्रेनेज तुंबल्यामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जीर्ण अथवा नादुरुस्त झाल्यास दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित नसून थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असल्याचे साळेगावकर यांनी आपल्या निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जुन्या D.I. आणि G.I. पाईपऐवजी HDPE पाईपलाईनची मागणी – सध्या अस्तित्वात असलेल्या D.I. आणि G.I. पाईपमधून पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी या लाईन्स ड्रेनेजच्या मार्गातून जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या जुन्या लाईन्सऐवजी अधिक सुरक्षित आणि टिकाऊ HDPE पाईपचा वापर करून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र लाईन ड्रेनेजच्या बाहेरून टाकण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको; कायमस्वरूपी उपाय हवा

वाडेवस्ती आणि दाट लोकवस्तीच्या भागांतील अशा पाईपलाईन्सची महापालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणांची नोंद घ्यावी आणि टप्प्याटप्प्याने स्वतंत्र HDPE लाईन टाकण्याचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी मूळ समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज या निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे.

नागरी प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा

पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका साळेगावकर घेत असल्याचे या निवेदनातून पुन्हा दिसून आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी निगडित प्रश्नांना प्रशासनाकडून प्राधान्य मिळावे आणि प्रत्यक्ष कामातून त्यावर तोडगा निघावा, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.आता महापालिका प्रशासन या मागणीची किती गांभीर्याने दखल घेते, संबंधित भागांतील पाईपलाईन्सची प्रत्यक्ष पाहणी कधी करते आणि स्वतंत्र HDPE पाईपलाईन टाकण्याबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमीदार – गणेश मारुती जोशी

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment