पुणे महापालिकेत आचारसंहितेतही निविदांचा धडाका? ₹१.४० कोटींच्या कामांवर निलेश निकम यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न ???

4 Min Read

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल – पुणे | पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील तब्बल १७ कामांच्या निविदा काढण्यात आल्याने महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.संबंधित कामांची एकूण किंमत सुमारे ₹१ कोटी ४० लाख ९५ हजार ८९१ रुपये असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश प्रकाशशेठ निकम यांनी प्रश्न उपस्थित करत संपूर्ण निविदा प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १३ ड, पुणे स्टेशन व जय जवाननगर परिसरातील विविध कामांसाठी या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चेंबर दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, मोठ्या व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकणे, पावसाळी चेंबर व पाइपलाइनची यंत्रांद्वारे साफसफाई तसेच पादचारी मार्गांची दुरुस्ती अशा कामांचा समावेश आहे. संबंधित कामांसाठी कंत्राटदाराकडे स्वतःची यंत्रसामग्री आणि दहा वर्षांचा अनुभव असण्याची अटही ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

आचारसंहितेत निविदा कशा काढल्या? – निलेश निकम 

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश प्रकाशशेठ निकम यांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेतील अनेक नवीन विकासकामांच्या प्रक्रिया थांबविण्यात आल्या असताना, एका विशिष्ट प्रभागातील ‘स’ यादीच्या १७ कामांच्या निविदांना नेमक्या कोणत्या नियमाच्या आणि कोणत्या लेखी परवानगीच्या आधारे पुढे नेण्यात आले? ही कामे खरोखरच अत्यावश्यक होती, तर त्यासाठी निवडणूक यंत्रणेची आवश्यक परवानगी किंवा अभिप्राय नेमका कोणत्या स्वरूपात घेण्यात आला? तो प्रशासनाने सार्वजनिक करावा.निकम यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, एका प्रभागातील ‘स’ यादीची कामे अत्यावश्यक म्हणून करता येत असतील, तर त्याच स्वरूपाची कामे असलेल्या इतर प्रभागांना समान निकष का लागू होऊ नयेत? प्रशासनाने याबाबत स्पष्ट आणि एकसमान धोरण जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे प्रश्न अधिक महत्त्वाचा

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली आणि आवश्यक मंजुऱ्या प्राप्त असलेली काही कामे सुरू ठेवता येतात. नव्या कामांच्या बाबतीत निधी, प्रशासकीय-तांत्रिक-आर्थिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण झालेली असणे यांसारख्या अटी नमूद आहेत. त्या अटी पूर्ण नसतील तर निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेण्याचा मुद्दा निर्माण होतो.त्याचवेळी पुणे महापालिकेतील सध्याच्या परिस्थितीत आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या १७ कामांना नेमकी कोणती प्रशासकीय आणि निवडणूकविषयक मान्यता मिळाली, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

महापालिका प्रशासनातही वेगवेगळ्या भूमिका या प्रकरणात परिमंडळ एकच्या उपायुक्त आशा राऊत यांनी संबंधित कामे पथ व मलनिःसारण विभागातील अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची असून निवडणूक शाखेकडे विचारणा केल्यानंतर निविदा काढण्यात आल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी देखभाल-दुरुस्ती व अत्यावश्यक कामे आचारसंहितेत करता येत असली, तरी ही कामे नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील असल्यामुळे आचारसंहितेनंतर करणे अधिक योग्य ठरले असते, अशी भूमिका मांडल्याचे वृत्त आहे.

लेखी परवानगी आणि संपूर्ण फाईल सार्वजनिक करा” – निकम यांची मागणी

निलेश निकम यांनी या प्रकरणात निविदा काढण्याचा प्रशासकीय निर्णय, संबंधित विभागांची मंजुरी, निवडणूक शाखेकडून घेतलेला अभिप्राय किंवा परवानगी, कामांना ‘अत्यावश्यक’ ठरविण्याचे निकष आणि निविदांची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

“आमचा विकासकामांना विरोध नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधांची अत्यावश्यक कामे झालीच पाहिजेत. मात्र आचारसंहितेच्या काळात नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. एका प्रभागाला जी परवानगी मिळते, त्याच निकषांमध्ये बसणाऱ्या इतर प्रभागांनाही समान न्याय मिळाला पाहिजे. या १७ निविदांमध्ये आचारसंहितेतील सर्व नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची सक्षम निवडणूक प्राधिकरणाने तपासणी करून वस्तुस्थिती पुणेकरांसमोर ठेवावी.” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश प्रकाशशेठ निकम यांनी केली आहे.या प्रकरणात आचारसंहितेचा प्रत्यक्ष भंग झाला आहे की संबंधित निविदा अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीच्या अनुमत अपवादात येतात, हे अधिकृत कागदपत्रे व सक्षम निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयावर स्पष्ट होणार आहे. मात्र एकाच महापालिका प्रशासनात या प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने ₹१.४० कोटींच्या १७ निविदांची पारदर्शकता आणि समान निकषांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातमीदार – पी. एस. सूर्यवंशी – हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment